Advertisement

Breaking News
Loading...

🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..! राज्यघटनेचे शिल्पकार: डॉ. बाबासाहेब आंबेडकर... युगपरिवर्तनाचे महानायक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

 


🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!

राज्यघटनेचे शिल्पकार: डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

युगपरिवर्तनाचे महानायक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135  व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

26 देशातील राज्यघटनेचा प्रचंड अभ्यास करून, परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी एक राष्ट्रनिष्ठ, संस्कृतीनिष्ठ अशी राज्यघटना लिहिली. या घटनेत लोकशाही, समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि कायद्याचे राज्य... या पाच बाबींचा समावेश केलेला आहे. म्हणून या पाच बाबी म्हणजे राज्यघटनेचे पंचप्राण आहे, असे बाबासाहेब सांगतात. साहजिकच हे पंचप्राण वेगळे केले तर राज्यघटनेचा केवळ सांगाडा शिल्लक राहील. अशी  भीती राज्यघटना सुपूर्त करताना म्हटले होते. भारत हे राष्ट्र म्हणून जगात उंच मानेने उभे राहिले पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी..' मी प्रथमतः भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीयच आहे' अशी भूमिका त्यांनी राज्यघटनेत मांडली. ते केवळ विचारांजवळ थांबत नाही तर विचारांच्या पलीकडे जावून नवा मानवी समाज कसा निर्माण होईल याचा ध्यास या राज्यघटनेत दिसून येतो. त्यामुळे बाबासाहेब केवळ दलितांचे नेते होते ही संकुचित वृत्ती आपण टाकून दिली पाहिजे. बाबासाहेब केवळ दलितांचे नेते नव्हते तर संपूर्ण भारतीय जनतेचे नेते होते. ही जाणीव व्यापक प्रमाणात निर्माण झाली पाहिजे. बाबासाहेबांची जयंती आज घराघरात, चौका चौकात साजरी होत आहे. ही खूप मोठी वैचारिक क्रांती आहे.

इंग्लंडचे प्रधानमंत्री स्टेनले बाल्डविन यांनी भारताला अधिक राजकीय अधिकार देण्याच्या संदर्भात २६ नोव्हेंबर १९२७ ला भारतीय संविधानिक आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन हे होते. म्हणून या आयोगाला 'सायमन कमिशन' असे संबोधले जाते. सायमन आयोगाशी विचार विनिमय करण्यासाठी राज्यस्तरावर विधिमंडळ सदस्यांच्या एका समितीची निवड करण्यात आली. या सात सदस्यांच्या समितीवर ५ ऑगस्ट १९२८ ला मुंबई विधिमंडळातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदस्यपदी निवड झाली. डॉ. आंबेडकरांचा अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास होता. त्यांनी राजकारणावरील काही पुस्तके वाचली होती. बाबासाहेबांना जाणीव झाली की, आता भारतीय राजकारणात संविधानाचा विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल. अशा वेळी मौन राहणे, अत्यंत धोक्याचे आहे. ते विचार करू लागले की सायमन आयोगाशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली आहे. म्हणून अस्पृश्यांच्या राजकीय हितांची सुरक्षा करण्यासाठी आणि देशाच्या राजकीय अधिकारांकरिता आपण काही भरीव कार्य केलेच पाहिजे.

प्रदेश समितीवर निवडून आल्याचे जाहीर झाल्याबरोबर बाबासाहेबांनी ६ आणि ७ ऑगस्टला आपल्या काही मित्रांकडून ४०० रूपये उधार घेतले. ८ ऑगस्टला तारापूरवाला बुकसेलर्सच्या दुकानातून ८५० रूपयांची संविधानाशी संबंधित पुस्तके विकत घेतली. ९ ऑगस्टपासून सकाळी आपल्या कार्यालयाच्या खिडक्या आणि दरवाजा बंद करून विकत घेतलेल्या १५-२० ग्रंथांच्या अभ्यासाला ते बसले.

काही लोक यायचे आणि दरवाजा ठोठावत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना परत जायला सांगत. काही वेळानंतर आणखी दुसरे लोक यायचे. ते देखील दरवाजा ठोठावत. त्यांना देखील ते परत जायला सांगत. त्यामुळे संविधानाशी संबंधित ग्रंथाचा अभ्यास करण्यामध्ये अडथळा व्हायचा. आपल्या अभ्यासात लोकांचा त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे कार्यकर्ते मडकेबुवा यांना सांगितले की, 'मडकेबुवा, दरवाज्याला बाहेरून कुलूप लावा. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी इराण्याकडून मला खिडकीतूनच चहा देण्याची व्यवस्था करा आणि दुपारचे व संध्याकाळचे जेवणदेखील खिडकीतूनच द्या.'

बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मडकेबुवांनी व्यवस्था केली. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले की, ' जर तुम्हाला काही कामासाठी माझी आवश्यकता वाटली तर मला बोलावून घ्या, मी कार्यालयाच्या बाहेरच्या बाकावर झोपून राहीन.' अशाप्रकारे कार्यालयाच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सतत दोन आठवडे अभ्यास केला. संविधानाच्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी अशा प्रकारे केली. तारापूरवाला बुकसेलर्सकडून नंतर नवीन पुस्तके खरेदी केली. पुढे या दुकानाची पुस्तके खरेदीची इतकी उधारी झाली की, त्यांना उधारीचे पैसे परत करण्यासाठी १९३६ मध्ये 'चारमिनार ' ही इमारत विकावी लागली. यावरून हे स्पष्ट होते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अभ्यासासाठी अतिशय कठोर परिश्रम घेतले. अप्रतिम आणि अद्वितीय असे भारतीय संविधान लिहिल्याबद्दल अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानद पदवी देऊन उचित सन्मान करण्यात आला.

                             .....रवी देवकर..


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments