मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे |दि. 25 एप्रिल 2026: मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत 24 एप्रिल रोजी रात्री घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 6 तासांत उलगडा करत मंद्रूप पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या आयशर टेम्पोमधून मालवाहतूक करत असताना मळसिद्धप्पा मंदिर परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांचा टेम्पो अडवून जबरदस्तीने वाहन थांबवले. त्यानंतर फिर्यादीस मारहाण करून अंदाजे ₹ 20,000/- रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तपास पथकाला तातडीने सूचना दिल्या.
पो. उपनिरीक्षक राज डांगे, सहायक फौजदार बापू शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल माजिद शेख, संदीप काळे व चालक श्रीशैल शिवणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने सिने-स्टाईल पाठलाग करत 2 आरोपींना जेरबंद केले असून तिसऱ्या आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. अटक आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू असून पुढील तपास पो. उपनिरीक्षक राज डांगे करत आहेत.
विशेष म्हणजे, अवघ्या 6 तासांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना ताब्यात घेण्याची ही धडाकेबाज कामगिरी मंद्रूप पोलिसांनी बजावली असून यामुळे परिसरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आरोपींची ओळख परेड घेण्यात येणार असल्याने त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments