Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- २०२ मनातलं महाभारत...!!

 


रविवारचा चहा क्रमांक- २०२ 


 मनातलं महाभारत...!!


शक्ती माणसाला महान बनवत नाही, ती फक्त त्याला इतरांपेक्षा वर उभं करते आणि वर उभं राहिल्यावर खाली दिसणारे सगळे लहान वाटू लागतात, इथेच माणूस चुकतो.कारण तो उंचीला श्रेष्ठत्व समजतो.  वाली  हाच तो क्षण जगत होता. जिथे त्याला वाटत होतं की तो अजेय आहे, पण अजेय असणं ही ताकद नसते, ती एक प्रकारची आंधळेपणाची अवस्था असते. कारण जेव्हा माणसाला वाटतं की तो कधीच हरु शकत नाही तेव्हा तो शिकणं थांबवतो आणि जो शिकणं थांबवतो तो आधीच हरलेला असतो, फक्त त्याला ते कळलेलं नसतं.

वालीने अनेक पर्वत उचलले, अनेक राक्षसांचा पराभव केला, पण स्वतःच्या मनातल्या संशयावर तो कधीच विजय मिळवू शकला नाही. कारण बाहेरचं युद्ध शक्तीने जिंकता येतं, पण आतलं युद्ध प्रामाणिकपणानेच जिंकावं लागतं आणि तिथेच तो कमी पडला; सुग्रीव हा त्याचा भाऊ होता, पण नातं टिकवण्यासाठी शक्ती लागत नाही, विश्वास लागतो आणि विश्वास एकदा तुटला की नातं वाचवण्यासाठी हजार ताकदीही अपुऱ्या पडतात; सुग्रीवाने भीतीतून चूक केली आणि वालीने अहंकारातून शिक्षा दिली, त्यामुळे दोघेही कुठेतरी हरले कारण भीती आणि अहंकार या दोन्ही गोष्टी सत्याला वाकवतात, पण फरक एवढाच की भीती पळते आणि अहंकार पाठलाग करतो.म्हणूनच वाली थांबला नाही, त्याने राज्य घेतलं कारण त्याला वाटत होतं की तो योग्य आहे, त्याने भावाला हद्द‌पार केलं कारण त्याला वाटत होतं की तो न्याय करतो आहे, त्याने त्याची पत्नीही घेतली कारण त्याला वाटत होतं की त्याचा त्यावर हक्क आहे. आणि इथेच माणूस सर्वात मोठी चूक करतो .तो स्वतःच्या चुकीला "हक्क” असं नाव देतो आणि जेव्हा चुकीला हक्काचं नाव दिलं जातं तेव्हा विनाश निश्चित होतो; कारण मग थांबवण्यासाठी कुणीतरी येणारच. आणि तेव्हा राम येतो, पण राम इथे फक्त देव नाही, तर परिस्थितीचा परिणाम आहे, तो त्या प्रत्येक अन्यायाचं उत्तर आहे जो खूप काळ साचत राहतो . जेव्हा परिणाम येतो तेव्हा तो नियम पाहत नाही, तो फक्त समतोल साधतो म्हणून राम समोरून युद्ध करत नाही, तो झाडामागून बाण मारतो  इथेच गोष्ट मनाला टोचते. कारण प्रश्न उभा राहतो की जर तू योग्य असशील तर तुला लपून का मारावं लागतं; हा प्रश्न वाली विचारतो, पण खरं तर हा प्रश्न प्रत्येक माणूस स्वतःला विचारायला घाबरतो कारण आपण सगळे कधी ना कधी आपल्या सोयीसाठी नियम वाकवतो आणि स्वतःला समजावतो की हे योग्य आहे; राम सांगतो की वालीने अधर्म केला होता म्हणून त्याला मारणं योग्य होतं, पण पद्धत चुकीची असली की मन पूर्णपणे ते स्वीकारत नाही आणि म्हणूनच वाली मरणानंतरही जिवंत राहतो, कारण त्याचे प्रश्न जिवंत राहतात.तो म्हणतो की जर मला सांगितलं असतं तर मी तुझ्यासाठी सर्व काही स्वतःहून केलं असतं आणि इथे एक मोठं सत्य उघड होतं की अनेक युद्धं प्रत्यक्ष लढली जात नाहीत, ती गैरसमजामुळे निर्माण होतात, अहंकारामुळे वाढतात आणि संवादाच्या अभावामुळे संपत नाहीत.

शेवटी जे घडतं ते केवळ न्याय नसतं, तो एक परिणाम असतो . नंतर लोक त्याला धर्माचं नाव देतात कारण जिंकणाऱ्याला अर्थ लावण्याचा अधिकार असतो, पण सत्य तिथेच उभं असतं शांत आणि कठोर की दोघेही कुठेतरी चुकले होते; आणि हेच "मनातलं महाभारत" आहे .जिथे तू कोणाच्याही बाजूने उभा राहू शकतोस .पण पूर्णपणे कुणालाच योग्य म्हणू शकत नाहीस .कारण प्रत्येक निर्णयात थोडासा स्वार्थ असतो.प्रत्येक न्यायात थोडासा अन्याय मिसळलेला असतो आणि शेवटी प्रश्न एकच उरतो तू खरंच जिंकलास का, की फक्त हरायला उशीर झाला; वाली  हरला तेव्हा सगळ्यांना दिसलं, पण राम जिंकला तेव्हा त्याच्या आत काय तुटलं हे कुणालाच दिसलं नाही आणि कदाचित तेच सर्वात मोठं सत्य आहे की काही विजय आवाज करत नाहीत, ते फक्त आत खोलवर काहीतरी कायमचं बदलून टाकतात.हा प्रश्न खटकतो कारण राम योग्य होता, पण त्याची पद्धत मनाला पटत नाही वाली  चुकीचा होता, पण त्याचा शेवट सरळ वाटत नाही. जेव्हा योग्य आणि अयोग्य दोन्ही एकत्र मिसळतात. तेव्हा मन गोंधळतं, रामाने अधर्म थांबवला, पण लपून मारणं प्रश्न निर्माण करतं. माणूस फक्त परिणामावर नाही, तर मार्गावरही न्याय करतो. वाली पूर्णपणे वाईट नव्हता, म्हणून त्याच्यावरची शिक्षा टोचते. हा प्रसंग आपल्यालाच आरसा दाखवतो. कारण आपणही नियम वाकवतो आपण स्वतःसाठी केलं तर योग्य, दुसऱ्याने केलं तर चुकीचं वाटतं म्हणून हा प्रश्न संपत नाही, तो प्रत्येक काळात पुन्हा उभा राहतो कारण इथे उत्तर नाही, फक्त अस्वस्थ करणारा सत्य आहे.राम म्हणून ज्याने वालीला झाडामागून मारलं, तोच पुढे कृष्ण म्हणून जन्म घेतो आणि ज्याच्यावर अन्याय झाला, तोच कृष्णाच्या अंतिम क्षणी जरा नावाचा शिकारी बनून परत येतो. ही कथा सूडाची नाही, तर समतोलाची आहे, कारण नियती कधीच पक्ष घेत नाही ती फक्त हिशेब पूर्ण करते. वाली अन्यायी होता, हे खरं आहे; पण त्याच्यावर अन्याय झाला, हेही तितकंच खरं आहे.

    हीच ती अस्वस्थ करणारी जागा आहे, जिथे सत्य दोन भागांत उभं राहतं. एक बाजू सांगते की रामाने अधर्म संपवला आणि दुसरी बाजू विचारते की पद्धत योग्य होती का. म्हणूनच तो प्रश्न संपला नाही; तो काळाबरोबर पुढे गेला आणि कृष्णाच्या आयुष्यात उत्तर बनून उभा राहिला.

कृष्णाला जरा चा बाण लागतो तेव्हा तो विरोध करत नाही, कारण त्याला माहिती असतं की हा शेवट नाही हा एक समतोल आहे. रामाने जे केलं त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं, पण कृष्णाने त्याचं उत्तर जगून दाखवलं; कारण काही गोष्टी शब्दांनी संपत नाहीत, त्या अनुभवानेच पूर्ण होतात. म्हणून इथे नियती अन्याय करत नाही, ती फक्त अपूर्ण राहिलेला अनुभव पूर्ण करते.आणि दुसरीकडे वालीचा तो प्रश्न जिवंत राहिला, कारण तो पूर्ण झाला नव्हता आणि कृष्णाच्या शेवटाने तो शांत झाला.

कारण जेव्हा माणूस स्वतः त्या जागी उभा राहतो, तेव्हा त्याला कळतं की न्याय फक्त बरोबर असण्यात नसतो, तर योग्य पद्धतीतही असतो आणि जेव्हा दोन्ही एकत्र येतात, तेव्हाच समतोल पूर्ण होतो. म्हणून ही कथा कुणाला दोष देत नाही ती फक्त दाखवते की प्रत्येक कृतीचा प्रतिसाद असतो, पण तो सूड म्हणून नाही, तर समज म्हणून परत येतो; आणि शेवटी प्रश्न उरत नाही, कारण उत्तर अनुभव बनून जगलं जातं.


 प्रा. दिलीप आनंदराव जाधव. सांगली. 

               सचिव 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.

            राज्य कोषाध्यक्ष

 कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments