Advertisement

Breaking News
Loading...

वादळी वाऱ्याचा कहर: तळे हिप्परग येथे १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू...

 


तळे हिप्परगा | हॅलो रिपोर्टर न्यूज : प्रतिनिधी  मल्लिकार्जुन कांबळे : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परग येथे रविवारी (दि. १९ एप्रिल) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एक हृदयद्रावक घटना घडली. फरहान असलम कल्याणी (वय १२) या निरागस बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. कल्याणी कुटुंब घरात सुरक्षित असल्याच्या भावनेत होते. घरात आई-वडील आणि लहान बहीण एका बाजूला तर फरहान दुसऱ्या बाजूला खेळत होता. पाचवीत शिक्षण घेणारा फरहान हा कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता.

सुमारे साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. घरावरील पत्र्याचे शेड जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले आणि त्यासोबत असलेले जड लोखंडी अँगल थेट फरहानच्या डोक्यावर कोसळले. या भीषण दुर्घटनेत फरहानचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आई-वडिलांच्या आक्रोशाने परिसर हेलावून गेला. सुदैवाने घरातील इतर सदस्य या दुर्घटनेतून बचावले असले तरी आपल्या लाडक्या मुलाचा मृत्यू डोळ्यादेखत पाहण्याचा आघात त्यांना सहन करावा लागत आहे.

सध्या संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी या कुटुंबाला तातडीने प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेने सोलापूर जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments