सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांविरुद्ध 'ऑपरेशन ऑल-आऊट' राबवत असताना स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि दोन दरोड्यांसह सहा घरफोड्यांच्या गंभीर गुन्ह्यात हवा असलेला सराईत आरोपी घुल्या ऊर्फ गुलाब ऊर्फ प्रितिज्ञान झिंगझिंग पवार (रा. कलकर्जाळ, ता. अक्कलकोट) याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
पुलाखाली लावला सापळा:
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर व त्यांचे पथक अक्कलकोट भागात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, "अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी घुल्या पवार हा अक्कलकोट-कोन्हाळी पुलाखाली थांबला आहे," अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी गराडा घालून आरोपीला ताब्यात घेतले.
कमरेला लावले होते धारदार शस्त्र:
पकडण्यात आलेल्या आरोपीची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक धारदार शस्त्र मिळून आले. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ गंभीर गुन्ह्यांत होता हवा:
अटक केलेला आरोपी अत्यंत सराईत असून त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत:
दरोडा: अक्कलकोट उत्तर आणि मोहोळ पोलीस ठाणे...
घरफोडी व चोरी: अक्कलकोट उत्तर, मंद्रुप आणि मंगळवेढा.
इतर गुन्हे: सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि विनयभंग (अक्कलकोट दक्षिण व मंद्रुप)...
या पथकाने बजावली कामगिरी:
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सपोनि अमित बाबर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, रवि माने, बाळराजे घाडगे, राहुल दोरकर, हरिष थोरात, मनोज राठोड, सुनंदा झळके आणि सुनील पवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329

0 Comments