सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : कारागृहातील ओळखीचा फायदा घेऊन एका इसमाला मदतीचे आमिष दाखवत बोलावून घेतले आणि त्याची लूटमार केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यात घडली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तत्परता दाखवत एका महिला आरोपीला अटक केली असून तिच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी ग्लेन पर्सी सिक्वेरा (रा. कल्याण डोंबिवली) हे एका सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्हा कारागृहात होते. तिथे त्यांची ओळख सराईत गुन्हेगार अजित उर्फ काळ्या सुरेश पवार याच्याशी झाली. जामिनावर सुटल्यानंतर अजितने फिर्यादीला संपर्क साधला आणि "माझी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या लोकांशी ओळख आहे, मी तुझे नाव केस मधून काढून टाकतो," असे आमिष दाखवून त्याला मंगळवेढ्यात बोलावले.
दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी त्यांच्या एका महिला मैत्रिणीसह ब्रह्मपुरी शिवारातील मुंडेवाडी रोडवर पोहोचले असता, आरोपी अजित पवार आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यांच्याकडील २ लाख ५० हजार रुपये रोख, सोन्याची चैन आणि चांदीची चैन असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटला.
एलसीबीची कारवाई आणि मुद्देमाल जप्त:
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना तपासाचे आदेश दिले होते. सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकाला माहिती मिळाली की, या गुन्ह्यात अजित पवारची पत्नी सुप्रिया अजित पवार (वय ३५, रा. नंदूर) ही देखील सामील असून ती घरी आली आहे.
पोलिसांनी सापळा रचून सुप्रिया हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने पती अजित पवार आणि सांगलीतील रणविर याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून:
रोख रक्कम: १,७५,००० रुपये
सोन्याची चैन: ५०,००० रुपये
चांदीची चैन: ५,००० रुपये
असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांनी बजावली कामगिरी:
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, सपोनि ज्ञानदेव वाघ, ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे आणि चालक सतीश बुरकुल यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329

0 Comments