मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सध्याच्या तरुणाईत वाढत चाललेल्या मानसिक तणावाचे आणि क्षुल्लक कारणांवरून टोकाचे निर्णय घेण्याचे चिंताजनक चित्र समोर आणणारी एक धक्कादायक घटना मोहोळ शहरात घडली आहे. नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, या कारणातून २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव प्रवीण जगदीश मायाचारी (वय २१) असे असून तो बीबीए (BBA) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सुमारे सात दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल फोन चुकून फुटला होता. त्यानंतर नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याने आई-वडिलांकडे वारंवार मागणी केली होती. मात्र, घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पालकांनी “सध्या पैसे नाहीत, पुढे घेऊन देऊ” असे सांगत त्याला समजावले होते.
३ एप्रिल रोजी रात्री जेवण आटोपल्यानंतर प्रवीण आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत तो बाहेर आला नाही. आईने वारंवार आवाज दिला तरी प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. अखेर वडिलांनी दरवाजा तोडला असता प्रवीणने गळफास घेतल्याचे समोर आले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. प्रवीणचे वडील इलेक्ट्रॉनिक्सचे छोटे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा पुढील तपास सुरू आहे.
हॅलो रिपोर्टर न्यूज कडून समाजासाठी संदेश :
“क्षणिक अडचणींवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे आत्महत्या नाही”
पालक व तरुणांनी संवाद वाढवणे, मानसिक ताण ओळखणे आणि योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments