सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर येथील बांधकाम कामगार कार्यालयात पूर्वी खासगी एजंटांचे वर्चस्व वाढले होते. यामुळे विविध योजनांमध्ये अनियमितता होऊन कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला होता. मात्र आता सर्व एजंटांना कार्यालयात प्रवेशबंदी घालण्यात आल्याने पारदर्शक आणि नियमबद्ध कामकाज सुरू झाले असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त तथा जिल्हा कार्यकारी अधिकारी मंगेश झोले यांनी दिली.
झोले यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रातील कामगार बहुतेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असतात. काही एजंट त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत जास्तीचे पैसे उकळत होते आणि शिष्यवृत्ती, भांडी वाटप, तसेच वैद्यकीय बिलांच्या नावाखाली नियमबाह्य कामे करून घेत होते. या प्रकारामुळे कार्यालयाच्या कामकाजातही अनियमितता आढळून आली.
पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एजंटांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही संघटना प्रतिनिधींना कामगारांच्या वैयक्तिक कामांसंदर्भात चौकशी करण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.
कामगारांनी स्वतः कार्यालयात येऊन नोंदणी, नूतनीकरण किंवा इतर कामे संबंधित अधिकाऱ्यांमार्फतच करून घ्यावीत, असे आवाहन झोले यांनी केले आहे.
कामगारांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा:
पूर्वी एजंटांमुळे अनेक चुकीची प्रकरणे घडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नोंदणी, नूतनीकरण किंवा इतर कोणत्याही सेवेसाठी कामगारांनी थेट नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि कोणत्याही एजंटाची मदत घेऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments