✨अध्यापनाचा प्रमोद आणि कर्तुत्वाचा पाठक: एक आदर्श जीवन प्रवास✨
"अक्षरांच्या वळणातून ज्यांनी घडविले अनंत भविष्य, त्या गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण हे कृतज्ञता दृश्य...
शिस्त, निष्ठा अन प्रामाणिकपणा ज्यांच्या श्वासात, असा हा आदर्श शिक्षक तळपतोय ज्ञानदानाच्या प्रकाशात. "
शिक्षण क्षेत्रात काम करणे म्हणजे केवळ माहितीचे संक्रमण करणे नव्हे, तर एका पिढीचे चारित्र्य घडवणे होय. हे शिवधनुष्य ज्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अत्यंत लीलया पेलले, असे एक अष्टपैलू आणि ऋजू व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद प्रभाकर पाठक सर. 30 एप्रिल 2026 रोजी ते आपल्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. हा केवळ एका शिक्षकाचा निरोप समारंभ नाही, तर एका तपस्वी प्रवासाचा कृतज्ञता सोहळा आहे.
मळोली ते पंढरपूर एक संघर्षमय प्रवास.
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मळोली या ग्रामीण भूमीत सरांचे बालपण घडले. ग्रामीण मातीतील कणखरपणा आणि संस्कार घेऊन त्यांनी शिक्षणाची वाट धरली. माध्यमिक शिक्षणासाठी करमाळा गाठले आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्याचे वैभव असलेल्या एस.पी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विज्ञानाची पदवी (B.Sc.)मिळवल्यानंतर शिक्षकी पेशाची ओढ त्यांना विटा येथील (B.Ed) कॉलेजमध्ये घेऊन गेली. सरांनी केवळ पदव्या मिळवल्या नाहीत तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्ञानाची तहान जपली.
"जिद्द आणि चिकाटीच्या बळावर गाठले ध्येय शिखर, अध्यापनाच्या कार्यात सरांचा नेहमीच होता आदर...!!"
सरांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली. कर्तुत्वाची कर्मभूमी गोपाळपूर, त्या ठिकाणचा मुख्याध्यापक म्हणून ऐतिहासिक कारकीर्द.
13 जून 1984 रोजी गोपाळ कृष्ण विद्यामंदिर,गोपाळपूर ता. पंढरपूर येथे ते रुजू झाले. विशेष म्हणजे पहिल्याच दिवसापासून प्रभारी मुख्याध्यापक व 1999 पासून मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली. 32 वर्षाचा काळ एकाच संस्थेत एकाच पदावर राहून संस्थेला एका उंचीवर नेऊन ठेवणे. ही साधी गोष्ट नाही एक मितभाषी प्रशासक असूनही त्यांचा दरारा मोठा होता. त्यांनी शाळेला केवळ इमारत मानले नाही, तर ते एक संस्कार केंद्र बनवले.
तत्त्वनिष्ठा आणि आदर्श मूल्ये ज्यांनी जोपासली ते पाठक सर:
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात महत्त्वाचे पैलू म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आणि शिस्तप्रियता, आजच्या युगात जिथे मूल्यांशी तडजोड केली जाते तिथे सरांनी नेहमीच 'सत्याला साथ' देण्याची भूमिका घेतली. सत्यासाठी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती अनेक सहकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
'निष्ठेची ही मशाल ज्यांनी जपली अंतरंगात, सत्याची साथ देत चालले सदा उजळ वाटेत...!!'
सरांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची मा. शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांच्यावरील अढळ निष्ठा. सावंत सरांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाठक सरांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच सकारात्मक पावले उचलली आहेत. निष्ठेचे हे नाते त्यांच्या प्रामाणिक स्वभावाची साथ देते. सावंत सरांच्या विचारांचा वारसा पुढे चालवताना त्यांनी कधीही आपल्या तत्त्वांना तिलांजली दिली नाही. निष्ठा कशी असावी, हे सरांच्या वागण्यातून पावलोपावली जाणवते.
"शब्दांना ज्यांच्या सत्याची जोड,
स्वभावात ज्यांच्या माणुसकीची ओढ...
शिस्तीचा दरारा अन मनाची श्रीमंती,
अशा व्यक्तिमत्त्वाला कायमच सलाम...!!"
'सुप्रभात ग्रुप आणि मैत्रीचे नाते'
सरांचे सामाजिक जीवन ही तितकेच समृद्ध आहे. ते सुप्रभात ग्रुपचे अत्यंत सक्रिय सदस्य आहेत. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मित्रांसोबत घालवलेला वेळ आणि त्यातून होणारी सामाजिक चर्चा हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माझ्यासाठी तर पाठक सर केवळ एक सहकारी किंवा शिक्षक नाहीत तर ते माझे जिवलग मित्र आहेत. संकटात धावून येणारा, सुखात मनापासून सामील होणारा आणि चुकीच्या वेळी कान टोचणारा असा हा मित्र मिळणे हे खरे तर भाग्य असावे लागते. त्यांच्याशी झालेली प्रत्येक चर्चा मनाला एक प्रकारची उभारी देऊन जाते.
आदर्श शिक्षक दांपत्य आणि कर्तबगार मुले: सरांचा संसार हा एक आदर्श शिक्षकाचा संसार कसा असावा याचा वस्तू पाठ आहे. त्यांच्या पत्नी सुवर्ण मॅडम या स्वतः विद्या विकास प्रशाला, टाकळी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. दोघेही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात असल्याने घराला एका आश्रयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या संस्काराचे फळ त्यांच्या मुलांच्या रूपाने पाहायला मिळते. मुलगा 'चिन्मय' आज चेन्नई येथे प्रतिष्ठित महिंद्रा कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. तर कन्या 'प्राजक्ता' पुण्यातील ( IT ) क्षेत्रात आपली मोहोर उठवत आहे. आपल्या मुलांनी शून्यातून विश्व निर्माण करावे हा सरांचा ध्यास पूर्णत्वास गेला आहे. स्वतःच्या पाल्यांना योग्य दिशा दाखवून त्यांना कर्तबगार बनवणे हीच सरांच्या आयुष्यातील मोठी कमाई आहे.
"अंगणी फुलली दोन रत्ने, कर्तुत्वाच्या वेलीवर,
संस्कारांचे लेणे झाले, या सुखी संसारावर...!!"
मुलांच्या या यशात सरांच्या संस्काराचा मोठा वाटा आहे.
"संस्काराची शिदोरी अन् मायेची ती सावली, आदर्श कुटुंब अन् सुसंस्कृती ही माऊली...!!"
निरोप घेताना सेवानिवृत्ती म्हणजे कामाचा शेवट नसून स्वतःसाठी आणि समाजासाठी अधिक वेळ देण्याची एक नवी संधी आहे. सेवानिवृत्ती हा केवळ शासकीय प्रक्रियेचा भाग आहे. पण विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनातून पाठक सर कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. त्यांचे मितभाषी असणे बरेच काही शिकवून जाते आणि त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन ठरेल.
"नवे क्षितिज, नवी स्वप्ने, नवा असो हा प्रवास,
आरोग्य लाभो सुखमय, हाच आमचा ध्यास.
रिटायरमेंटच्या या वळणावर, शुभेच्छांचा वर्षाव,
तुमच्या कार्यातून नेहमीच मिळावा नवा उत्साह...!!"
प्रमोद पाठक सर तुमची उणीव शाळेला नेहमीच भासेल. तुम्ही दिलेली शिस्त आणि विचारांची शिदोरी कायमच मार्गदर्शन करेल.
"थांबला असेल कामाचा व्याप, पण विचारांचा वारसा अफाट आहे.
पुढील सुखी आयुष्यासाठी, शुभेच्छांची हीच वाट आहे."
तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य उत्तम आरोग्यदायी, सुखसमाधानाचे आणि दीर्घायुष्याचे लाभो, हीच सदिच्छा...!!
राजेंद्र महादेव आसबे
सहशिक्षक:- साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तावशी.
संपर्कप्रमुख:- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती, पुणे जिल्हा.
जिल्हाध्यक्ष:- सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ, सोलापूर.
संचालक:- सोलापूर जिल्हा कृती समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्यादित पंढरपूर.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


0 Comments