बरूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत एका 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नातेवाईक असलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैला सोमनाथ बागले (वय 45, रा. सध्या बरोर, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या नातू समर्थ कारस्तार (वय 5) याला आरोपी अंकुश परसप्पा कारस्तार याने सोबत नेले होते. काही वेळाने आरोपीने समर्थला बेशुद्ध अवस्थेत घरी आणले.
दरम्यान, मुलाच्या गळ्यावर, हनुवटीवर व डोळ्याजवळ जखमेच्या खुणा आढळून आल्याने संशय निर्माण झाला. तातडीने उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी समर्थला मृत घोषित केले.
या घटनेबाबत आरोपीने सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलास मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 2023 च्या कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा 6 जून 2026 रोजी रात्री 8:15 वाजता दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस ठाणे अंमलदार आर. एल. डांगे यांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.


0 Comments