रविवारचा चहा क्रमांक- २०८
टेन्शनमुक्त जगण्याचा पासवर्ड
सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री मिटेपर्यंत आपण एकाच गोष्टीशी झुंज देत असतो. तिचं नाव आहे टेन्शन. ऑफिसचं टेन्शन, घरचं टेन्शन, पैशाचं टेन्शन, नात्यांचं टेन्शन आणि सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे 'लोक काय म्हणतील' याचं टेन्शन. या टेन्शनच्या गर्दीत आपण जगायचं मात्र विसरून जातो.
पण जरा थांबून विचार करा. आयुष्य खरंच एवढं गुंतागुंतीचं आहे का? की आपणच ते उगाच अवघड करून ठेवलंय? उत्तर सोपं आहे. टेन्शन घ्यायचंच नाही. आयुष्य बिनधास्त जगायचे. पण थांबा, ही बिनधास्ती म्हणजे स्वैराचार नव्हे. इथेच तर खरी गंमत आहे. आपल्याला जगायचं आहे 'मस्तीत पण शिस्तीत'.
जगात सगळ्यात अवघड काय असेल तर ते आहे आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं. आपण दुसऱ्याला फसवू शकतो, पण स्वतःला नाही. ज्या दिवशी आपण स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकतो, त्या दिवशी अर्धी लढाई जिंकतो.
प्रामाणिकपणा म्हणजे काय? तर आपल्या चुका मान्य करणं. आपल्याला जे जमत नाही ते कबूल करणं. आणि जे योग्य वाटतं त्यासाठी ठामपणे उभं राहणं. एकदा का मनाला ही सवय लागली की बाहेरचं वादळ कितीही मोठं असलं तरी आत शांतता नांदते. रात्री उशाशी डोकं टेकवलं की झोप शांत लागते. कारण मनात अपराधीपणाचं ओझं नसतं.
आपला सगळ्यात जास्त वेळ कशात जातो माहित आहे? दुसऱ्याचा विचार करण्यात. शेजारच्याने नवी गाडी घेतली, भावाच्या मुलाला परदेशात नोकरी लागली, मैत्रिणीचं वजन कमी झालं. या सगळ्या गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात. मग सुरू होतो तुलना करण्याचा खेळ. आणि तुलना आली की स्पर्धा आली, जळफळाट आला, टेन्शन आलं.
यावर एकच उपाय आहे. दुसऱ्याच्या ताटात डोकावणं बंद करा. त्याच्या ताटात श्रीखंड आहे म्हणून आपल्या ताटातली वरणभाताची चव कमी होत नाही. उलट आपण आपली वरणभात अधिक प्रेमाने खाल्ली तर तीच श्रीखंडाहून गोड लागते. कुणाचं वाईट करायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. एवढं एक व्रत घेतलं तरी आयुष्यातला 50 टक्के ताण कमी होतो. कारण द्वेष, मत्सर, असूया या भावना आधी आपलंच रक्त जाळतात.
गावातल्या पारावरून ते कॉर्पोरेट ऑफिसच्या कॅन्टीनपर्यंत एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे गॉसिप. चार लोक एकत्र आले की पाचव्या माणसाची उलटसुलट चर्चा सुरू होते. "तो असा, ती तशी". बोलून आपल्याला क्षणभर बरं वाटतं, पण यातून आपण काय कमावतो?
मागे बोलणं म्हणजे स्वतःची ऊर्जा फुकट घालवणं. त्या वेळात आपण एखादं पुस्तक वाचू शकलो असतो, एखादं नवं गाणं शिकू शकलो असतो, किंवा निवांत श्वास घेऊ शकलो असतो. आणि महत्वाचं म्हणजे आज आपण ज्याच्याबद्दल बोलतो, उद्या तेच लोक आपल्याबद्दल बोलणार हे नक्की. म्हणून हा खेळच बंद केलेला बरा. तोंडावर गोड बोलून मागून वार करण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही चांगलं.
माणूस हा विचित्र प्राणी आहे. त्याला नाराज व्हायला फार मोठं कारण लागत नाही. तुम्ही त्याचा फोन उचलला नाही, त्याच्या वाढदिवसाला स्टेटस ठेवलं नाही, त्याच्या मताला हो मध्ये हो मिळवला नाही. झालं. तो दुखावला. आणि गंमत म्हणजे यातले निम्मे लोक असे असतात ज्यांचा तुमच्या आयुष्याशी दुरान्वयानेही संबंध नसतो.
एका कॉलेजच्या कट्ट्यावर दोन मित्र बसले होते. एक जण सतत वैतागलेला. दुसऱ्याने विचारलं, "काय रे, काय झालं?" तो म्हणाला, "अरे तो समीर माझ्याशी बोलत नाहीये दोन दिवसांपासून." मित्राने विचारलं, "का? भांडण झालं का?" तो म्हणाला, "नाही रे, मी सहज त्याला विचारलं की तुझा शर्ट कुठून घेतला, तर तो म्हणाला मला का विचारतो, तुझं काय जातंय. तेव्हापासून तो कट मारतोय."
बघा, किती क्षुल्लक कारण. अशा लोकांसाठी आपण आपली मनःशांती का घालवायची? कुणी वाईट बोललं, वाईट करण्याचा प्रयत्न केला, तरी आपण आपला तोल ढळू द्यायचा नाही. कारण शेवटी प्रत्येकजण आपापल्या कर्माचं फळ भोगत असतो. तुम्ही जर स्वच्छ असाल तर चिखलफेक करणाऱ्याचे हात आधी बरबटतात.
हल्ली सोशल मीडियामुळे हा आजार अधिकच बळावलाय. सकाळी उठल्यावर पहिले आपण काय करतो? तर दुसऱ्याचं स्टेटस बघतो, स्टोरी बघतो. कोण कुठे फिरायला गेलं, कोण काय जेवतंय, कोणाची मुलाखत झाली. हे बघून आपण नकळत आपल्या आयुष्याशी तुलना करायला लागतो. "आपणच मागे राहिलो" ही भावना घर करते.
पण आपण हे विसरतो की सोशल मीडिया हे एक रंगमंच आहे. इथे प्रत्येकजण आपल्या आयुष्यातला फक्त 'हायलाईट' दाखवतो. 'बिहाइंड द सीन्स' कुणीच दाखवत नाही. त्या हसऱ्या फोटोमागे काय वेदना आहेत, त्या परदेशवारी मागे किती कर्ज आहे, हे आपल्याला माहित नसतं. म्हणून दुसऱ्याच्या बाह्य जगण्यावरून आपल्या आतल्या जगण्याला जज करू नका. आपली लढाई आपल्याशी आहे, दुसऱ्याशी नाही
आतापर्यंत आपण 'शिस्त' बघितली. आता 'मस्ती' बघू. शिस्त म्हणजे चौकट, आणि मस्ती म्हणजे त्या चौकटीत रंग भरणं.
मस्तीत जगणं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं. पावसाचे थेंब अंगावर झेलणं, आवडतं गाणं मोठ्याने गुणगुणणं, मनसोक्त जेवण करणं, मित्रांसोबत गप्पा मारताना वेळेचं भान विसरणं. मस्तीत जगणं म्हणजे जबाबदारी झटकणं नव्हे, तर जबाबदाऱ्या हसत खेळत पार पाडणं.
अनेक लोकांना वाटतं की आयुष्य गंभीरपणे जगलं पाहिजे. पण गंभीरपणा आणि गांभीर्य यात फरक आहे. गांभीर्य हवं, पण सतत कपाळावर आठ्या घालून फिरण्यात काय अर्थ? कामाच्या ठिकाणी 100 टक्के द्या, पण घरी आल्यावर तो बोजा दाराबाहेरच काढून ठेवा. आयुष्य एकदाच मिळतं, ते 'उद्या करू' म्हणून पुढे ढकलण्यात काय होशील!
सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आपण फक्त स्वतःचा विचार करून चालणार नाही. आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत ज्यांना आपली गरज आहे. आईवडील, बायकोमुलं, मित्र, शेजारी. त्यांच्यासाठी आपण काय करतो हे महत्वाचं.
हीत चिंतणे म्हणजे मोठमोठे दानधर्म करा असं नाही. कधी कधी समोरच्याचं निवांत ऐकून घेणं, ही पण मोठी मदत असते. रस्त्यावरच्या भुकेल्या कुत्र्याला एक बिस्कीट देणं, बस मध्ये जागा देणं, कुणाच्या चांगल्या कामाचं मनापासून कौतुक करणं. या छोट्या गोष्टींनी आपण दुसऱ्याचं हीत साधतोच, पण आपल्यालाही आतून एक समाधान मिळतं.
स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालता आली पाहिजे. आपली प्रगती करताना दुसऱ्याचा पाय खेचायचा नाही. उलट शक्य असेल तर हात देऊन वर खेचायचं. कारण शेवटी आपण सगळे एकाच समाजाचे घटक आहोत. एकाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं की आपल्या मनातलं शल्य कमी होतं.
आयुष्याचा सगळ्यात मोठा पासवर्ड काय असेल तर तो आहे 'फरक पडत नाही'. कुणी सोडून गेलं, फरक पडत नाही. कुणी नावं ठेवली, फरक पडत नाही. अपेक्षित यश मिळालं नाही, फरक पडत नाही.
याचा अर्थ बेफिकीर होणं नव्हे. तर प्रयत्न करूनही एखादी गोष्ट जमत नसेल तर तिचा बाऊ न करता पुढे जाणं. कारण एक दरवाजा बंद झाला तरी दहा नवे उघडतात, फक्त आपले डोळे उघडे हवेत.
जेव्हा तुम्ही ठरवता की 'मला टेन्शन घ्यायचंच नाही', तेव्हा अचानक सगळं सोपं व्हायला लागतं. डोक्यावरचं अदृश्य ओझं उतरतं. मग लक्षात येतं की अरे, आयुष्यात काहीच कमी नव्हतं. कमी होती ती फक्त बघण्याची नजर.
म्हणून सांगतो, हे तत्वज्ञान एकदा जगून बघा. सकाळी उठा, आरशात बघा, स्वतःला स्माईल द्या आणि म्हणा, "आजचा दिवस माझा आहे. मी तो मस्तीत पण शिस्तीत जगणार." कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही, फक्त स्वतःशी आणि दुसऱ्याशी प्रामाणिक राहायचं.
बघा, मग कसं आयुष्य सुंदर दिसायला लागतं ते. कारण शेवटी, मन शांत तर जग सुंदर. आणि हे शांत मन मिळवण्यासाठी कशाचीच गरज नाही, फक्त एका निर्णयाची गरज आहे. तो निर्णय तुम्ही आज घेणार का?
प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली
सचिव
सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सांगली
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ,महाराष्ट्र राज्य.


0 Comments