लांबोटी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मोहोळ तालुक्यातील लांबोटी सब स्टेशन कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात शिरापूर पंचक्रोशीतील 20 ते 25 शेतकऱ्यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टू-फेज वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी ते सब स्टेशन कार्यालयात गेले असता कार्यालयात एकही अधिकारी अथवा जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच कार्यालयात हालचाल रजिस्टरदेखील उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
याबाबत शेतकऱ्यांनी मोहोळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून कार्यालयाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. "हे कार्यालय आहे की धर्मशाळा?" असा सवाल करत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत जाब विचारण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शिरापूर परिसरातील कृषी पंपांसाठी घेण्यात आलेला 'टोप' (वीजपुरवठा) तात्काळ सुरू करण्यात यावा. पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास सर्व शेतकरी लांबोटी सब स्टेशन कार्यालयात घुसून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात उद्या मोहोळ कार्यालयात लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्यासह मगन ताकमोगे, सचिन काळे, अमोल शेंडगे, बापू कोळेकर, शाम घरुंबुडे, सोनू साठे, प्रदीप ताकमोगे, बाळू ताकमोगे, समर्थ शिराळ आदी उपस्थित होते.


0 Comments