छत्रपती संभाजीनगर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीकडे डोळेझाक करण्याच्या मोबदल्यात लाखोंची लाच मागणाऱ्या अंबडच्या तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतुकीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी संबंधितांकडून तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचत तहसीलदाराला अटक केली.
या कारवाईची माहिती वाळू माफियांपर्यंत पोहोचताच संतप्त झालेल्या काही जणांनी संबंधित ठिकाणी तोडफोड केल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासन आणि अवैध वाळू व्यवसायातील कथित साटेलोटे पुन्हा चर्चेत आले आहेत.
एसीबीच्या तपासादरम्यान आरोपीच्या मालमत्तेची झडती घेण्यात आली. त्यामध्ये महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अटकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, अवैध वाळू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या साखळीचा तपास होण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.




0 Comments