Advertisement

Breaking News
Loading...

“जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच विकास बुडाला! डबक्यांतून वाट काढताना नागरिक हैराण...” सिद्धेश्वर शाळेसमोरील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर माजिदीलगत रस्त्यावर मोठे डबके; शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप, तातडीने कारवाईची मागणी...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला तसेच सिद्धेश्वर शाळेसमोरील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर माजिदीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून डबक्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, शासकीय कामांसाठी दररोज ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांना याच पाणथळ रस्त्यातून मार्ग काढावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रस्त्याच्या मधोमध साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून अनेक ठिकाणी खड्डे पाण्याखाली लपल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वयोवृद्ध नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र समजल्या जाणाऱ्या परिसरातच अशी बिकट अवस्था असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रस्त्यांचीच अशी अवस्था असेल, तर शहरातील इतर भागांचे काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


स्थानिक नागरिकांनी तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास मोठे अपघात घडू शकतात, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


नागरिकांचा सवाल:

प्रशासनाच्या दारातच पाण्याचे डबके, मग सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?

आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का, की नागरिकांना आणखी कित्येक दिवस चिखल आणि डबक्यांतूनच वाट काढावी लागणार?

Post a Comment

0 Comments