मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. ०७ जून २०२६ | पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या खूनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, मंद्रूप पोलिसांनी केवळ दोन तासांत गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक करून आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली आहे.
दि. ०६ जून रोजी समर्थ कास्तार (वय ५) या चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वेळ न दवडता तांत्रिक तपास, स्थानिक माहितीदार व गोपनीय यंत्रणा यांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला वेग दिला.
तपासादरम्यान समर्थला शेवटचे अंकुश परशराम कास्तार (वय २५, रा. हलसंगी, जि. विजयपूर, कर्नाटक) याच्यासोबत पाहिल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी संशयिताचा माग काढत अवघ्या दोन तासांत त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीस ११ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्यासह संपूर्ण पथकाने या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
जनतेचा वाढता विश्वास:
अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याची इतक्या वेगाने उकल करून आरोपीला अटक केल्याने मंद्रूप पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.



0 Comments