Advertisement

Breaking News
Loading...

वडार समाजासाठी विशेष शिबिर; ६२ लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण... प्रदेश भटके-विमुक्त विकास परिषदेचा उपक्रम; शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी अरिफ नदाफ | वडार समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेली जात प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रदेश भटके-विमुक्त विकास परिषदेच्या वतीने मंद्रूप व माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथे विशेष जात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ६२ लाभार्थ्यांना विविध जातींचे प्रमाणपत्र दाखले काढून देण्यात आले.

यावेळी भटके-विमुक्त विकास परिषदेचे संघटनमंत्री राहुल चव्हाण व प्रदेशाध्यक्ष उद्धव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यात आले. समाजातील अनेक नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय प्रक्रिया आणि कार्यालयीन अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन एकाच ठिकाणी मार्गदर्शन व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन, निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे गणेश सोनटक्के तसेच तहसीलदार विष्णू बुट्टे यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अभियान प्रमुख सुनील पवार, तालुका कार्यवाह कैलासजी चौधरी, अशासकीय समिती सदस्य संजय राठोड, महादेव कोटकर, श्रीशैल होनमाने, तालुका संयोजक मशाप्पा कोळी, सहसंयोजक यल्लाप्पा बंदपट्टे आदी उपस्थित होते.

जात प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजना, रोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून ६२ लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्रे मिळाल्याने समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, समाजातील गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली. प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments