Advertisement

Breaking News
Loading...

सांगोला पोलिसांची दमदार कामगिरी... सांगोल्यात दहावी बोर्ड पेपर चोरीचा गुन्हा उघड; अल्पवयीन आरोपी ताब्यात, साहित्य जप्त...

 

                                     प्रतिकात्मक 

सांगोला | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दिनांक १८ मार्च २०२६

सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेमध्ये घडलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला असून त्याच्याकडून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दिनांक १७ मार्च २०२६ रोजी विद्यामंदिर प्रशालेतील कस्टडी रूममध्ये ठेवण्यात आलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९(३), ३३४, ३०५(अ) तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासासाठी सांगोला पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्याकडून स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना सदर गुन्हा एका अल्पवयीन बालकाने केल्याचे स्पष्ट झाले. पालकांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेले इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक मोटारसायकल, चोरीस गेलेल्या दहावीच्या प्रश्नपत्रिका तसेच तीन कोऱ्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे (सांगोला पोलीस ठाणे) यांच्या आदेशान्वये सपोनि वाघे, सपोनि मोरे, सपोनि विजय शिंदे, सपोनि भाऊसाहेब गोसावी, पोसई पुजारी, पोसई पाटील, मपोसई चव्हाण, पोहेकॉ वाघमोडे, पोहेकॉ अस्लम काझी, पोहेकॉ वजाळे, पोहेकॉ राजगे, पोहेकॉ सावंत, पोहेकॉ प्रमोद गवळी, पोहेकॉ संतोष देवकर, पोहेकॉ क्षीरसागर, पोहेकॉ जाधव, पोना लेंगरे, पोकॉ पाटील, पोकॉ मारुती पांढरे, पोकॉ माळी, पोकॉ कुंभार, पोकॉ राजू आवटे, पोकॉ अमोल वाडकर, पोकॉ रमेश सूर्यवंशी, पोना इरकर, पोकॉ वाघमोडे यांनी या तपासात मोलाचे सहकार्य केले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मोरे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments