Advertisement

Breaking News
Loading...

राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ने घेतलेला सद्यस्थितीचा आढावा...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर दिनांक – 18 मार्च 2026राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक होणार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघातील जागा रिक्त होती. सद्यस्थितीला भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे प्रमुख दावेदार मानले जातात. तर बारामती मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे. राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स' या आमच्या संस्थेने थेट ग्राउंडवर जाऊन निवडणुकीचा आढावा घेतला आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?

बारामती विधानसभा मतदारसंघात संपूर्ण बारामती तालुक्यासह 7 जिल्हा परिषद गट,  बारामती आणि मालेगाव बु. या 2 नगरपालिकांचा समावेश होतो. तसेच एकूण 161 गावे आणि 386 बूथचा या मतदारसंघात समावेश होतो. बारामती मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 83 हजार 767 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 93 हजार 496 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 90 हजार 271 इतकी आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती मतदारसंघात असलेले कार्य, जनसंपर्क, त्यांना मानणारा मतदार, कामाबद्दल असलेली तत्परता आणि स्पष्टोक्तेपणा यामुळे नागरिकांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनानंतर  मतदारांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाल्याचे दिसून येते. यामुळे आगामी पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांची विधानसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड होण्याची शक्यता दिसून येते. मात्र, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक हे माध्यम असून बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवायची की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याचे सांगितले. यामुळे निवडणूक बिनविरोध होईल का नाही याबद्दल संभ्रम दिसून येतो. तसेच 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती' सलग्नीत असलेल्या रुग्णालयाचे नाव बदलून स्व. अजित पवार यांचे नाव देण्याची झालेली प्रक्रीया यामुळे बारामती मतदारसंघामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असलेला धनगर समाज नाराज दिसून आला. बारामती मतदारसंघात अंदाजे 28% धनगर मतदार असून या समाजाचा निवडणुकीवर मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते.

बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने व पक्षाकडून विरोधात उमेदवार देण्यात येणार नसल्याची बाब आणि अजित पवार यांच्याबद्दल मतदारांमध्ये निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे सुनेत्रा पवार यांचा आगामी निवडणुकीत विजय होण्याची अधिक शक्यता असल्याचे ग्राउंडवर मतदारांसोबत केलेल्या संवादातून दिसून आले.

*राहुरी विधानसभा मतदारसंघात सहानुभूती विरुद्ध राजकीय अनुभव:*

राहुरी विधानसभा मतदारसंघ 3 तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. राहुरी तालुक्यातील 1 लाख 93 हजार 683 (58%)  मतदार, अहिल्यानगर तालुक्यातील 82 हजार 240 मतदार (25%) मतदार आणि पाथर्डी तालुक्यातील 57 हजार 29 मतदारांचा (17%) राहुरी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.  एकूण 7 जिल्हा परिषद गटांचा पूर्णपणे समावेश होतो. तसेच राहुरी नगरपालिकेचा समावेश होतो. याशिवाय दरेवाडी नवनागापूर आणि नागरदेवळे या जिल्हा परिषद गटातील काही गावांचा या मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघात एकूण 138 गावांचा समावेश होत असून एकूण 374 बूथ आहेत. राहुरी मतदारसंघातील एकूण मतदान 3 लाख 32 हजार 952 इतके आहे. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 71 हजार 988 इतके तर महिला मतदार 1 लाख 60 हजार 964 इतके आहेत.

एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले, तसेच भाजपकडून सुजय विखे पाटील यांच्या नावाची देखील नागरिकांमध्ये चर्चा दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा दिसून येते. मात्र, अलीकडच्या काळामध्ये माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केलेली स्तुती त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा ग्राउंडवर नागरिकांमध्ये होत असल्याची दिसून येते. तसेच भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट केले असले तरी मतदारांमध्ये मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा दिसून येते.

भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी शिवाजी कर्डिले यांची सहानुभूती असल्याचे दिसून येते. मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव आणि युवा चेहरा अशी अक्षय कर्डिले (वय 30) यांची ओळख असली तरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलने  मर्यादित जनसंपर्क आणि मर्यादित राजकीय अनुभव यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे दिसून येते.

जर भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले विरुद्ध  महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत झाल्यास, सहानुभूतीचा मुद्दा, माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले यांना पाठिंबा मिळाल्यास अक्षय कर्डिले यांच्या विजयाची शक्यता असल्याचे दिसून येते. मात्र, राजकीय अनुभवाच्या मुद्द्यावर निवडणूक झाल्यास अक्षय कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता दिसून येते.

तसेच प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवाराचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांचा एकतर्फी किंवा बिनविरोध विजय होण्याची शक्यता दिसून येते.

*निवडणुकीचे मुद्दे: शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती, राजकीय अनुभवाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेचा मुद्दा, शेतकऱ्यांच्या समस्या, अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे रखडलेले काम* :

दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघातील नागरिकांमध्ये सहानुभूती असल्याचे दिसून आले. आगामी पोटनिवडणुकीत  सहानुभूतीचा मुद्दा महत्वाचा ठरणार असल्याचे दिसून येते. तसेच शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांची प्रतिस्पर्धी संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय अनुभवासोबत तुलना होत असल्याने हा देखील मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता दिसून येते.

लाडकी बहीण योजनेचा मुद्दा विधानसभा 2024 प्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये तितकासा प्रभावी ठरण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून आले.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला व दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली, याशिवाय, साखर कारखान्यांकडून उसाची बिले वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे दिसून आले.  अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेले अपघात, वाहतूक कोंडी, धूळ यामुळे नागरिक त्रस्त दिसून आले.

बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार की नाही ही बाब आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. मात्र, निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी होण्याची शक्यता अधिक दिसून येते. तर राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले, सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता दिसून येते. मात्र, कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती, सत्तेतील पक्ष असल्याचा फायदा, सुजय विखे पाटील यांची ताकद, प्राजक्त तनपुरेंची पक्षाविषयी असलेली संभ्रमाची भूमिका यामुळे राहुरी मतदारसंघात आजच्या घडीला भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येते.

नोट – रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स म्हणजेच ‘रुद्र’ ही संस्था ओपिनीयन, एग्झीट पोल आणि ग्राउंड रिसर्च करते. संस्थेने नुकताच राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा ग्राउंडवर जाऊन राजकीय सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.



Post a Comment

0 Comments