सोलापूर (ग्रामीण) | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |दि. 19 मार्च 2026 :
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत माढा तालुक्यातील बेंबळे येथील एका पैलवानाला अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 50,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी अवैध अग्निशस्त्राचा वापर करून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, टेंभूर्णी येथे करमाळा चौक परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. हॉटेल सागर परमिट रूममध्ये संशयित इसम बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत अभिषेक उर्फ भैय्या गायकवाड (वय 28, रा. बेंबळे, ता. माढा) याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीच्या कंबरेला मॅगझीनसह गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड आढळून आला.
या प्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 1959 अंतर्गत कलम 3, 7, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने करत आहेत.
न्यायालयात हजर केले असता आरोपीस 20 मार्च 2026 पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस अधीक्षक आत्राम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


0 Comments